दैठणा : येथील पाणीपुरवठा योजनेस घरघर लागली असून भारत निर्माण योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी असूनही केवळ नादुरुस्त जलवाहिनीमुळे ऐन हिवाळ्यात दिवसाआड तोही अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे दैठणेकरांच्या नशिबी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
गतवर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी महिलांना दुपारपर्यंत भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यात काय परिस्थिती होईल, याचीही चिंता दैठणेकरांना लागली आहे. मागील सात वर्षांपूर्वी भारत निर्माण योजनेंतर्गत सव्वाकोटी रुपये निधी मिळाला होता. साळापुरी येथील गोदावरी पात्रात भारत निर्माण योजनेंतर्गत विहिरीचे खोदकाम केले होते.
या विहिरीला भरपूर पाणीही लागले. त्यामुळे विहिरीचे काम थांबले. त्यानंतर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने विहिरीतील पाणी गावापर्यंत पोहचू शकले नाही. ही जलवाहिनी वारंवार जागोजागी फुटत असल्याने या पाण्याचा उपयोग दैठणेकरांना झाला नाही. या जलवाहिनीमधून पाणीपुरवठा करण्यासाठी सरपंच उद्धवरावकच्छवे, जिल्हा परिषदेचे सदस्य उत्तमराव कच्छवे हे प्रयत्नशील आहेत. भारत निर्माण योजनेची पाईप लाईन दुरुस्त करून हे पाणी ग्रामस्थांना मिळाले तर दैठणेकरांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो. (वार्ताहर)
■ भारत निर्माण योजनेचा बोजवारा उडाल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत एक दिवसाआड तोही अपुरा पाणीपुरवठा दैठणेकरांच्या नशिबी आल्यामुळे ग्रामस्थ या पाण्याची साठवण दिवसेंदिवस करीत आहेत. त्यामुळे या पाण्यामध्ये डासांचे प्रमाण वाढले असून आजाराला आमंत्रण असाच प्रकार येथे पहावयास मिळत आहे. तसेच पिण्यासाठी ग्रामस्थ गोदावरी नदीतील पाण्याचा उपयोग करीत असल्यामुळे हे पाणी क्षारयुक्त असल्याने ते शरीरासाठी अपायकारक ठरू शकते.त्यामुळे ग्रा.पं. ने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
■ भारत निर्माण योजनेंतर्गत जलवाहिनीची दुरुस्ती करून आठ दिवसांमध्ये ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा केला करून नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दैठणा येथील सरपंच उद्धवराव कच्छवे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिले. पाणीपुरवठा सुरळीत करणार