परभणी : शहरात दररोज ‘मॉर्निंग वाॅक’ला जाणाऱ्यांची संख्या संचारबंदी व कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घटल्याचे रविवारी सकाळी २ ठिकाणी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. यामुळे नेहमी गर्दीने गजबजणाऱ्या या ठिकाणांवर नागरिकांची तुरळक गर्दी होती. तर अजूनही काही नागरिक कोरोनाला आमंत्रण देत फिरायला जाणे व माॅर्निंग वाॅकला जाणे पसंत करत आहेत.
कोरोनाच्या काळात प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे व्यायाम, प्राणायाम तसेच मॉर्निंग वॉकला जाणे, जीमला जाणे आदी बाबींकडे लक्ष देत आहेत. मागील काही दिवसात परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन लागल्याने व कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. शहरातील कृषी विद्यापीठ परिसरात व राजगोपालाचारी उद्यानात नागरिक मॉर्निंग वॉकला जाणे तसेच व्यायाम करणे यासाठी नित्यनेमाने सकाळी जात असत. मात्र, यातील राजगोपालाचारी उद्यान बंद असल्याने तर कृषी विद्यापीठ परिसरात काही निर्बंध घातल्याने ही संख्या कमी झाली आहे.
पोलिसांकडून कुठलीही कारवाई नाही
परभणी शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून अद्याप मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा अन्य व्यायामासाठी सकाळी बाहेर पडणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच यासाठी पोलिसांचे कोणतेही पथक तैनात करण्यात आलेले नाही.
अद्याप अनेकांना वाटेना कोरोनाची भीती
एकीकडे कोरोना संसर्ग वाढला असताना, काही नागरिक अजूनही मॉर्निंग वॉकला जाणे तसेच एकत्रित व्यायाम करणे व गप्पा मारणे असे प्रकार काही ठिकाणी करत आहेत. मात्र, या मॉर्निंग वॉकद्वारे आपण कोरोनाला घरी येण्याचे आमंत्रण तर देत नाही ना? असा प्रश्न अद्यापही या नागरिकांना पडलेला नाही.
या ठिकाणांची केली पाहणी
राजगोपालाचारी उद्यान - सध्या उद्यान बंद असल्याने काही नागरिक अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थान परिसरातील रस्ता ते उद्यानाच्या चारही बाजूने तयार केलेल्या फूटपाथवर माॅर्निंग वाॅकला जात असल्याचे दिसून आले. रविवारी सकाळी ६.४५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान येथे पाहणी केली असता, याठिकाणी वय वर्ष ४५ ते ७०च्या मधील २० ते ३० नागरिक फिरताना आढळले. बहुतांश नागरिकांनी मास्क घातला होता. काही महिला फूटपाथवर एकत्रित गप्पा मारताना पाहायला मिळाल्या.
कृषी विद्यापीठ परिसर - शहरातील काळी कमान येथील कृषी विद्यापीठाचे मुख्य गेट ते विद्यापीठ भागातील फूड टेक्नाॅलाॅजी महाविद्यालयापर्यंत २ किलोमीटरच्या परिसराची ७.०५ ते ७.३० दरम्यान पाहणी केली. येथे मोजून १० जण माॅर्निग वाॅकला आल्याचे दिसून आले. तर या भागातील ओपन जीममध्ये ३ ते ४ जण नियम पाळून व्यायाम करताना दिसून आले. तीन ४५ ते ५० वर्षीय महिला मास्क घालून फिरायला आल्या होत्या तर तीन युवक हातात मास्क आणि मोबाईल घेऊन गप्पा मारत वाॅक करताना दिसून आले.