महानगरपालिकेने शहरातील पथदिव्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम एका एजन्सीला दिले आहे. शहरातील सर्व पथदिव्यांची दुरुस्ती करणे, तसेच ते नियमित सुरू व बंद करण्याची जबाबदारी या एजन्सीवर आहे. शहरातील जिल्हा स्टेडियम परिसरात काही दिवसांपूर्वी हे पथदिवे बसविण्यात आले. मात्र, या पथदिव्यांची नियमित देखभाल- दुरुस्ती होत नसल्याचे दिसून येत आहे. येथील पथदिव्यांत बिघाड झाल्याने २५ दिवसांपूर्वी ते काढून नेण्यात आले; परंतु त्यानंतर अद्यापपर्यंत नवीन पथदिवे बसविले नाहीत. त्यामुळे या भागात अंधार पसरला आहे. दररोज रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा स्टेडियम परिसरात अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने असून, वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, २५ दिवसांपासून या भागात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावर दोन ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सध्या या खड्ड्यात पाणी साचले असून, अंधारामुळे खड्डा लक्षात न आल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पथदिव्यांअभावी अपघाताची भीती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने या भागातील पथदिवे तातडीने बसवून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
पथदिवे बसविण्यास महापालिकेची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST