परभणी : कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता पुन्हा नव्याने शहरात पथकांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, या पथकांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे.
मागील दोन-तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक असताना शहरात अनेक नागरिक या नियमांचा बोजवारा उडत आहेत. त्यामुळे संसर्ग आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. असे असताना अनेक नागरिक विनामास्क शहरात फिरतात. काही ठिकाणी गर्दीही होत आहे. कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मध्यंतरी मनपा प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय पथकांची स्थापना केली होती. मात्र, ही पथके कालांतराने बंद पडली. प्रशासनाने आता पुन्हा पथकांची नियुक्ती केली आहे.
शहरातील तीनही प्रभाग समितीत पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यात महानगरपालिकेतील ३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या पथकांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारपासून प्रत्यक्ष प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात होईल. त्यामुळे आता शहरात विनामास्क फिरले, तर संबंधित नागरिकास मोठा दंड केला जाणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली.