परभणी: खडतर चढाई,कमी होत जाणारा ऑक्सिजन, प्रचंड थंडी या परिस्थितीत स्वराज्य ट्रेकर्सच्या सदस्यांसह अन्य गिर्यारोहकांनी उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या रांगेतील १२ हजार ८०० फूट उंचावरील ब्रह्मताल आणि तुंगनाथ ही दोन शिखरे ४ फेब्रुवारी रोजी यशस्वीपणे सर केली.
परभणी येथून २८ जानेवारी रोजी १७ गिर्यारोहकांचा प्रवास उत्तराखंड राज्यातील चमौली जिल्ह्यातील लोहजंग बेस कॅम्पपासून सुरू झाला. या मोहिमेस सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. भेकलताल, झेंडी टॉप तसेच ब्रह्मताल असे सलग तीन दिवस गिर्यारोहण करीत २ फेब्रुवारी रोजी समुद्र सपाटीपासून १२ हजार ८०० फूट उंचीवर असलेले ब्रह्मताल शिखर सर करून 'भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा रोमहर्षक घोषणा दिल्या. तसेच झाडे लावा,पर्यावरण वाचवा, प्लास्टिक कचरा टाळा, स्वच्छता पाळा' असा संदेश असलेला फलक फडकवून पर्यावरण समृध्दीचा संदेश दिला. या तीन दिवसीय मोहिमेनंतर ४ फेब्रुवारी रोजी या गिर्यारोहकांनी तुंगनाथ शिखर यशस्वीपणे सर करीत बर्फवृष्टीचा आनंद ही लुटला. शिखर समुद्रसपाटीपासून ११ हजार ९५० फुट उंचीवर आहे. या दोन्हीही शिखरांवर वजा ५ ते १० तापमान होते.
या सतरा जणांचा सहभागया मोहीम परभणीतील गिर्यारोहक रणजित कारेगावकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत अजय मलकुनायक, माधव यादव, महेंद्र मोताफळे, किरण रोपळेकर, डॉ.जयंत बोबडे, रवी रेड्डी, दयानंद जमशेटे,विष्णू मेहत्रे, गणेश यादव, महेश मोकरे, अभिजित मेटे, उमेश फुलपगार, नारायण रेवणवार, प्रसाद सूर्यवंशी, गुलाब गरुड, नितीन काळे आदींचा सहभाग होता.
ग्लोबल वॉर्मिंग गंभीर विषय‘‘गिर्यारोहकांच्या मोहिमांतून सामाजिक, भौगोलिक, ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच भाषिक विचारांची देवाणघेवाण होते. तसेच फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी हिमालयात अजून म्हणावी, तशी बर्फवृष्टी होत नाही. यासह इतर कारणांनी ग्लोबल वॉर्मिंग हा गंभीर विषय बनत चालला आहे. त्यावर सर्वांनीच वेळीच पावले उचलली पाहिजेत.- रणजित कारेगावकर, गिर्यारोहक