शनिवारी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी हे खगोल दृश्य सुरू होणार आहे. जसजसा सूर्य मावळतीला जाईल, तसतसा त्याचा संधिप्रकाश कमी होत जाणार असून ही पिधान युती ठळकपणे दिसून येणार आहे. सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर चंद्राची कोर आकाशात दिसेल. सायंकाळी ७.१९ च्या दरम्यान चंद्राच्या प्रकाशित भागाच्या खालच्या भागातून मंगळ ग्रह बाहेर पडताना दिसणार आहे. हे दृश्य तब्बल दोन तास पाहता येणार आहे. ही अनोखी घटना यापूर्वी १४ एप्रिल २००७ रोजी घडली होती. तब्बल २१ वर्षांनंतर ही खगोलीय घटना उघड्या डोळ्यांनी पाहण्याची संधी परभणीकरांना पाहण्यास मिळणार आहे. तेव्हा सर्व खगोलप्रेमींनी आपल्या घराच्या गच्चीवरून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
पिधान म्हणजे काय?
जेव्हा चंद्र एखाद्या तेजस्वी तारा किंवा ग्रहासमोरून जातो, त्यावेळी तो तारा किंवा ग्रह काही काळासाठी दिसेनासा होतो. अशा प्रकारच्या घटनेला पिधान युती, असे म्हणतात. पिधान हे एक प्रकारचे ग्रहणच असते. ही पिधान युती आकाशात अनेकदा होत असते. आपल्या भागामध्ये पिधान युती बघण्याचा योग बऱ्याच वर्षांनी आला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात ही खगोलीय घटना पाहावयास मिळणार आहे.