परभणी शहरातील जिंतूर रोडवरील कृषि विज्ञान केंद्रा लगतच्या शेततळ्यात वेदांत विकास जाधव (वय १२ रा.रामनगर, परभणी) हा मुलगा सायंकाळी पडला. २० फुटाच्या या शेततळ्यात पडलेला मुलगा बूडत असताना त्याला वाचविण्यासाठी परिसरात हजर असलेले बाबासाहेब नारायण पैठणे (वय ४०, रा.धर्मापूरी, ता.परभणी) यांनी शेततळ्यात उडी मारली. तळ्यात गाळ असल्याने दोघेही शेततळ्याच्या बाहेर येत नसल्याचे काही जणांच्या लक्षात आले. तसेच शेततळ्यात पडलेल्या मुलाची सायकल शेततळ्याचा परिसरात होती. त्यावरुन ही माहिती काही नागरिकांनी या भागात राहणारे स्कूलबस संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांना दिली. ठाकूर यांनी ही माहिती नानलपेठ पोलिसांना दिली. त्यानंतर नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह मनपाच्या अग्निशामक दलाचे कानोेडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहिम सुरु केली. शेततळ्यात गेलेल्या या दोघांचेही मृतदेह रात्री ८.३० च्या सुमारास सापडले. पोलीस व अग्निशमन विभागाने सुमारे दोन तासांची शोध मोहिम राबविल्यानंतर दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. नानलपेठ पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. वेदांत जाधव हा नेमका पोहायला गेला की पडला, याचा शोध लागला नाही. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती.
शेततळ्यात बूडणाऱ्या मुलास वाचविण्यास गेलेल्या व्यक्तीचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST