पालम : शहरात नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी लाखो रुपये खर्च करून नगर पंचायतीने बांधकाम केलेल्या सार्वजनिक शौचालयाला वर्षभरापासून कुलूप लावण्यात आले आहे. याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असून, शासनाचा निधी कुचकामी वापरात गेला आहे.
पालम शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीने उदात्त हेतूने नवा मोंढा भागात लाखो रुपये किमतीची मोक्याची जागा सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यासाठी नगरपंचायतीला उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी नगर पंचायतीने बांधकाम केले. तसेच या शौचालयाचा वापर सुरू करण्यात आला होता. पण, यानंतर सबंधित ठेकेदाराच्या खासगी अडचणीमुळे शौचालय कधी बंद तर कधी सुरू रहात होते. मागील वर्षभरापासून मात्र कायम कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे या इमारतीच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य वाढले असून, डुकरांनी ठाण मांडले आहे. विशेष म्हणजे स्वच्छता संदेश देणारे मजकूर भिंतीवर रंगविण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियानचा दिंडोरा पिटणाऱ्या नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे.