परभणी : मृत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांसह सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी लक्ष्मण हाके गुरुवारी दुपारी आले होते. यावेळी आंदोलनस्थळी भूमिका मांडण्यासाठी त्यांनी सुरुवात केली असता काही आंदोलनकर्त्यांनी त्यांचे भाषण रोखण्याचा प्रकार घडला. त्यांच्या हातातील माइक हिसकावून घेत कार्यकर्त्यांनी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्तक आहात, असा आरोप केला.
परभणीतील संविधान अवमान घटनेनंतर धरणे आंदोलन सुरू आहे. मृत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी लक्ष्मण हाके गुरुवारी आले होते. या दोन्ही ठिकाणी भेट दिल्यानंतर ते आंदोलन मैदानात दाखल झाले. यावेळी त्यांनी भूमिका मांडण्यासाठी भाषणाला सुरुवात करताच काही कार्यकर्त्यांनी उभे राहून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक आहात, असा आरोप केला; तसेच हाके यांच्यावर वाल्मीक कराड यांना पाठिंबा देण्यासाठी काम करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी करून संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.
दरम्यान, हाके यांनी मी आंदोलनाला यापूर्वी कौटुंबिक कारणाने येऊ शकलो नाही. मात्र, आज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. चळवळीत काम करणाऱ्या नेत्यासह सोमनाथचा यामध्ये मृत्यू झाला आहे. ही अंगावर शहारे आणणारी घटना असून यामध्ये संबंधित पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणाले. भारतीय संविधानच सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे या घटनेत न्याय निश्चित मिळेल, मी फक्त पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.