परभणी : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी आता बारावी उत्तीर्ण असणाऱ्या मुलींनाही परीक्षा देण्याची संधी न्यायालयाने दिल्याने या माध्यमातून सैन्यदलात दाखल होण्याचा मुलींचा मार्ग मोकळा झाला आहे.
शैक्षणिक सत्रात राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एन.सी.सी.) माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. एन.सी.सी. उत्तीर्ण आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एन.डी.ए.ची प्रवेश परीक्षा आतापर्यंत देता येत होती. मात्र मुलींना ही संधी नव्हती. न्यायालयाने मुलींनाही एनडीएच्या प्रवेश परीक्षेसाठी संधी दिली आहे. त्यामुळे सैन्य दलात भरती होण्यासाठी आता मुलींना देखील संधी मिळणार आहे.
लष्करात प्रवेशासाठी...
जिल्ह्यात धर्मापुरी येथे मुलींसाठी स्वतंत्र सैनिकी शाळा चालविली जाते. मात्र आता न्यायालयाच्या निर्णयामुळे एन.डी.ए.च्या माध्यमातून मुलींनाही सैन्य दलात भरती होण्याची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यात एनसीसीचे एकच केंद्र
नांदेड येथील ५२ महाराष्ट्र बटालियन अंतर्गत येथील श्री शिवाजी महाविद्यालयात मुलांसाठी एन.सी.सी. केंद्र चालविले जाते. मात्र मुलींसाठी जिल्ह्यात एकही एन.सी.सी. केंद्र नाही.
काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एन.डी.ए.मध्ये दाखल होण्यासाठी आतापर्यंत मुलांनाच प्रवेश परीक्षा देता येत होती. लेखी, तोंडी परीक्षा आणि त्यानंतर तीन वर्षांचे प्रशिक्षण दिल्यानंतर पदवी प्राप्त होते.
न्यायालयाने आता मुलींनाही ही परीक्षा देता येईल, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण असणाऱ्या मुलींना परीक्षा देता येईल. एन.सी.सी. उत्तीर्ण मुलींसाठी प्राधान्य मिळणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.