शहरात विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचणीचा धडाका महापालिका व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने मागील आठवडाभरात राबविला होता. मागील दोन दिवसांपासून ही मोहीम थंडावली आहे. यातच बुधवारी बौद्ध पौर्णिमेची शासकीय सुटी असल्याने पोलीस व महापालिकेचे पथक शहरात तपासणीसह वाहनांच्या दंडात्मक कारवाईसाठी सक्रिय नसल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारी शहरात नागरिकांचा मुक्त संचार बिनधास्तपणे सुरू होता. तपासणी होत नसल्याने अनेकांनी मुख्य रस्त्याने ये-जा करणे सुरूच ठेवले होते.
वेळ दुपारी १२.३० ते १
शहरातील काळी कमान परिसरात दुपारी एक वाजेच्या सुमारास केवळ सहा पोलीस कर्मचारी कार्यरत होते. येथे महापालिकेचे तपासणी पथक दिसून आले नाही, तर शिवाजी चौक येथे तीन पोलीस कर्मचारी व महापालिकेच्या तपासणी पथकातील दोन कर्मचारी कार्यरत होते. मात्र, तेथे चाचणी करण्यासाठी कोणीही नागरिकांना अडविले नाही.
वेळ दुपारी ४ ते ५
शहरात दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान जिंतूर रोडवरील जाम नाका व शिवाजी चौक येथे पाहणी केली असता दोन्ही ठिकाणी पोलीस व महापालिकेचे पथक दिसून आले नाही.
वाहनांच्या तपासणीकडे कानाडोळा
शहरात जागोजागी पोलिसांचे पथक तैनात करून केली जाणारी तपासणी बुधवारी कुठेच दिसून आली नाही. शिवाजी चौक, काळी कमान वगळता अपना काॅर्नर, जाम नाका येथे तर पोलीस कर्मचारी दिसूनही आले नाहीत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एकच वाहतूक पोलीस सकाळी ११ वाजता कार्यरत असल्याचे दिसून आले.