वाळूअभावी रखडली घरकुल बांधकामे
परभणी : जिल्ह्यात अजूनही अनेक वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे खुल्या बाजारपेठेत वाळूचे दर वधारलेलेच आहेत. महागाची वाळू खरेदी करून घरकुल बांधकाम करणे शक्य नसल्याने लाभार्थ्यांनी बांधकामे थांबविली आहेत. विशेष म्हणजे, घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना त्याकडे मात्र साफ दुर्लक्ष केले जात आहे.
वाळू चोरीमुळे महसूलचे उत्पन्न बुडाले
परभणी : जिल्ह्यात मागील वर्षभरापासून वाळूची चोरी होत आहे. पोलिसांनी मागच्या दहा दिवसांत ७ ठिकाणी कारवाया करून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. कोरोनाच्या संसर्गामुळे महसूल प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजनांत गुंतलेले आहे. याचा फायदा वाळूमाफिया उचलत असून, मोठ्या प्रमाणात वाळू चोरी वाढली आहे.
मोंढा बाजारपेठेतील उलाढाल ठप्प
परभणी : जिल्ह्यात संचारबंदी काळात शेतमालाच्या विक्रीला परवानगी दिली असली तरी शेतकऱ्यांनी मात्र बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल थांबली आहे. रबी हंगामातील पेरण्या ओसरल्यानंतर या बाजारपेठेत मंदीचे सावट आहे. मागच्या १ एप्रिलपासून या बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे.
शहरी भागात रस्त्याचे काम सुरू
परभणी : गंगाखेड-परभणी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या शहराच्या हद्दीत हे काम सुरू असून, उड्डाणपुलापासून ते पिंगळगड नाल्यावरील पुलापर्यंत एका बाजूने रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. एका बाजूचा रस्ता मात्र खोदून ठेवला आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहने चालविताना वाहनधारकांना सध्या कसरत करावी लागत आहे.