तालुक्यातील संबर व सावंगी परिसरातून पूर्णा नदी वाहाते. या नदीपात्रातील वाळू धक्क्याचा लिलाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाळूमाफियांनी या नदीपात्रातून मागील अनेक दिवसांपासून वाळू उपसा सुरू केला आहे. रात्रंदिवस वाळू उपसा करून वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वाळूमाफिया फोफावले आहेत. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी तक्रारी करूनही महसूल प्रशासन विभागाकडून कारवाई केली जात नाही. गुरुवारी केलेल्या पाहणीमध्ये पूर्णा नदी पात्रातून वाळूमाफिया भरदुपारी वाळू उपसा करत होते. त्याचबरोबर सावंगी- संबर या रस्त्यावर अनेक ठिकाणी खबरे दुचाकीवर बसून असल्याचे दिसून आले. त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन पूर्णा नदी पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा तत्काळ थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
संबर - सावंगी रस्त्याची लागली वाट
वाळूमाफिया दिवसा वाळू उपसा करून रात्रीच्या वेळेस संबर - सांवगी या रस्त्यावरून वाळू वाहतूक करतात. त्यामुळे या रस्त्याची पूर्णतः वाट लागली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता रहदारीयोग्य राहिला नसून, वाहनधारकांना वाहने चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाळूमाफियांना आवर घालून रस्ता दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.