कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा द्या
परभणी : वीज वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना रात्री वीज पुरवठा देण्यात येत आहे. मात्र रात्री पिकांना सिंचन करताना अनेक वेळा कृषिपंपाजवळच्या पेटीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर विंचू, सर्पदंश व रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई मिळेना
परभणी : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे यावर्षी अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून, या पीक लागवडीवर केलेला सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई शासनाने भरून काढणे अपेक्षित असताना केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना मदत देऊन ७५ टक्के शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे आर्थिक समस्या वाढल्या आहेत.
रस्त्याची दुरवस्था
परभणी : पाथरी-सोनपेठ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात वाहने फसली आहेत. हा रस्ता वर्दळीचा असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ डागडुजी केली जात आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.
सिंचन वाढले
परभणी : जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी, मासोळी, ढालेगाव, मुदगल, आंबेगाव, डिग्रस, तलाव बंधाऱ्यासह छोटे-मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्याचबरोबर दुधना, पूर्णा, गोदावरी आदी नद्या प्रवाही आहेत. त्यामुळे रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गहू पिकांसाठी शेतकरी सिंचन करू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी सिंचन वाढले आहे.
पीक कर्जाची गती वाढवा
परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील बँकांना प्रशासनाने ४०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केवळ १.८९ टक्केच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी गाठले आहे. त्यामुळे रबी हंगामातील पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.
.
''मागेल त्याला शेततळे''साठीचे पोर्टल बंद
परभणी : मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आपले सरकार हे पोर्टल ऑनलाईन नोंदणीसाठी मागील तीन आठवड्यांपासून बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून, शेततळे घेण्यासाठी महाईसेवा केंद्राकडे चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.