परभणी : जिल्ह्यातील ३ हजार ७५० क्षयरुग्णांना पोषक आहारासाठी प्रति महिना ५०० रुपयांचे अनुदानाचा लाभ दिला असल्याची माहिती जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ.कालिदास निरस यांनी दिली.
येथील जिल्हा क्षयरोग केंद्रात २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.निरस बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस,पी. देशमुख, डॉ.मुंढे, डॉ.नाईक, विठ्ठल रणबावरे, गायकवाड, जोशी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते क्षयरुग्णांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जि.प. सीईओ शिवानंद टाकसाळे म्हणाले, जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी सर्व स्तरातून खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, औषध विक्रेते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्सरे केंद्रांतून जास्तीत जास्त सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय योजनांचा लाभ घेऊन व आरोग्य यंत्रणेस सहकार्य करुन जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यास हातभार लावावा, असे आवाहन टाकसाळे यांनी यावेळी केले.
मागील वर्षी जिल्ह्यात १ हजार ९३८ क्षयरुग्ण होते. यावर्षी साधारणत: १ हजार ४०० रुग्ण आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा दिलासादायक आहे. क्षयरुग्ण खोकलल्यानंतर त्यांच्या तोंडातून अनेक जंतू हवेत पसरतात. तसेच हवेतून इतरांच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे क्षयरोगाचाही संसर्ग वाढू शकतो. तेव्हा तोंडाला मास्क लावल्यास क्षयरोगाच्या फैलावास प्रतिबंध बसणार आहे. तेव्हा रुग्णांनी मास्क लावणे बंधनकारक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मुख्य कार्यक्रमानंतर रेल्वेस्थानक, ॲटोरिक्षा चालक आणि शहरातील गर्दीच्या ठिकाणी क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात आली.