परभणी : मधमाशी पालनासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध असून, त्यासाठी विविध योजना आहेत. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्ली अनुदानित कौशल्य विकास आधारित अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ‘मधमाशी पालन’ या विषयावर २३ मार्चपासून तीनदिवसीय प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. धर्मराज गोखले म्हणाले की, पिकांमध्ये पराग सिंचनासाठी कीटकसृष्टीतील मधमाशांचे महत्त्वाचे स्थान असून, शेतकऱ्यांनी शेतीपूरक जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन केल्यास आर्थिकदृष्ट्या फायदा होऊन मधमाशांमुळे पीक उत्पादनात वाढ होते. मधामध्ये औषधी गुणधर्म असून, औषधी उद्योगात मोठी मागणी आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालन व्यवसायाचा पर्याय निवडावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. संजीव बंटेवाड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. फारिया खान यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ.श्रद्धा धुरगुडे यांनी आभार मानले. तांत्रिक सत्रात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी पराग सिंचनासाठी कीटकसृष्टीतील मधमाशांचे स्थान व मधमाशांच्या प्रजाती यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. धीरजकुमार कदम, डॉ. सदाशिव गोसलवाड, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. अनंत लाड, डॉ. संजोग बोकन, डॉ. राजरतन खंदारे, दीपक लाड आदींसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.