तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनेलप्रमुख आपले उमेदवार निवडून यावेत, यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. गावागावांत प्रचाराचा जोर वाढला असल्याचे चित्र आहे. उमेदवार प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीवर भर देत आहेत तसेच महानगरात गेलेल्या मतदारांना मतदानासाठी कसे आणले जाईल, याची व्यूहरचना आखली जात आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी विविध प्रलोभने दाखविली जात असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. गावागावांत समूह पार्ट्याचे आयोजन केले जात असून यासाठी दारू पुरविली जात आहे. हा कारभार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी विशेष पथक स्थापन करून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. मागील तीन दिवसांत या पथकाने ६० हजारांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. यामध्ये १० जानेवारीला तालुक्यातील केकरजवळा येथून १५ बॉक्स, ११ जानेवारीला रामेटाकळी येथून ८ बॉक्स अन्य एका ठिकाणी कारवाई ६० बॉटल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
विशेष पथक तालुक्यात तळ ठोकून
ग्रामपंचायत निवडणुकीत दारूचा अवैध साठा केला जात असल्याने पोलीस अधीक्षक जयंत मिना यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे विशेष पथक तालुक्यात तळ ठोकून असून मागील तीन दिवसांत चंद्रकांत पंडितराव पवार, विश्वास सुधाकरराव खोले, सुग्रीव किशनराव केंद्रे, नीलेशकुमार दौलतराव भुजबळ, शंकर प्रल्हादराव गायकवाड, राहुल दत्तात्रय चिंचाणे, जमिलोदिन मयनोदिन फारखी, यशवंत मरीबा वाघमारे, दीपक अंजय्या मुदिराज यांच्या पथकाने दारूचा साठा जप्त केला आहे.