बोरी येथील बसस्थानकासमोर असलेल्या ५ दुकानांना १० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिंतूर व परभणी येथील अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मुंजा गोरे यांचे साईराज मशिनरी स्टोअर्स मधील ठिबक व तुषार संचासह महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. यामध्ये गोरे यांचे १० लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच या दुकानाच्या बाजूला असलेले संतोष गायकवाड यांचे पार्थ प्रिंटिंग दुकान जळाले. यामध्ये गायकवाड यांचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच संजय कंठाळे यांच्या हेअर सलूनला आग लागून दुकानातील साहित्य जळून खाक झाले. यामध्ये त्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच संतोष जैन यांचे हॉटेल जळून ५0 हजार रुपयांचे नुकसान झाले. बालाजी भुसारे यांचे हेअर सलून आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झाले. त्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. असे एकूण पाच दुकानांमधील साहित्य जळून खाक झाले. यामध्ये या दुकानदारांचे १९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंडित शिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकुश चौधरी, संजय काळे, अनिल शिंदे हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या घटनेत नुकसान झालेल्या साहित्याचा पंचनामा करण्यात आला. नुकसानग्रस्त दुकानदारांना तत्काळ मदत देण्याची मागणी होत आहे.
शॉर्टसर्किटमुळे आग; पाच दुकाने जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST