जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, खत, बियाणे, किटकनाशकांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्यातील बाजारपेठेत रासायनिक खत कंपन्यांनी वाढीव दराने खत उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे १० टक्के शेतकऱ्यांनी नवीन दरानेच खताची खरेदी केली. त्यानंतर शेतकऱ्यांचा वाढलेला असंतोष पाहून केंद्र सरकारने खताच्या अनुदानात वाढ करून जुन्या दरानेच शेतकऱ्यांना खताची विक्री करण्याचे निर्देश दिले. मात्र परभणी जिल्ह्यातील बाजारपेठेत शिनवारपर्यंत नवीन दरानेच खताची विक्री सुरू होती. त्यामुळे बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला होता. त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने नवीन दराने खताची विक्री केल्यास संबंधित दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची इशारा देण्यात आला. त्यानंतर शनिवारपासून मात्र जुन्या दराने दुकानदारांनी खताची विक्री सुरू केली आहे. सध्या बाजारपेठेत एमआरपीनुसार खत उपलब्ध झाले असले तरी इफ्को कंपनीच्या १०:२६:२६ या खताची १ हजार १७५ रुपये, १२:३२:१६ खताची १ हजार १८५ रुपये, २०:२०:०:१३ या खताची ९७५ आणि डीएपी १२०० रुपये या दराने उपलब्ध झाले आहे. मात्र खताच्या बॅगवर १ हजार ७५० व १ हजार ९०० रुपये एमआरपी असल्याने काही शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत दुकानदारांनी शनिवारपर्यंत नवीन दरानेच खताची विक्री केली. मात्र रविवारी परभणी येथील नवा मोंढा भागात केलेल्या पाहणीतून शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जुन्या दराने दुकानदारांनी खत विक्री केल्याचे दिसून आले.
...तर कायदेशीर कारवाई- आळसे
इफ्को व इतर रासायनिक खत कंपन्यांनी नवीन एमआरपीचा खत जुन्याच किंमतीनुसार विक्री करावा, या संदर्भातील परिपत्रक काढून दुकानदारांना निर्देश दिले आहेत. या उपरही एखाद्या दुकानदाराने नवीन दराने खत विक्री केल्यास त्या दुकानदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
बाजारपेठेत मुबलक खताचा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी जुन्याच दराने खत खरेदी करावा. एखाद्या दुकानदारासंदर्भात तक्रार असल्या कृषी विभागाकडे तक्रार करावी. खताचा काळा बाजार थांबविण्यासाठी जिल्ह्यात १० पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक संतोष आळसे यांनी दिली.
खताची कृत्रिम टंचाई
परभणी येथील बाजारपेठेत रविवारी केलेल्या पाहणीत काही दुकानदार डीएपी खत नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे काही दुकानदारांकडून खताची कृत्रिम टंचाई केली जात असल्याचे दिसून आले.
खत दरवाढीच्या भीतीने आम्ही नवीन दराने खत खरेदी केला आहे. त्यामुळे शासनाने खत खरेदीची आगाऊ रक्कम वापस करावी. प्रति बॅगमागे ७०० ते ८०० रुपये जास्तीचे आकारण्यात आले आहेत. मी ५० बॅग रासायनिक खत खरेदी केले आहे.
- अर्जुन रन्हेर, शेतकरी, डिग्रस.
केंद्र शासनाचा रासायनिक खत कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय झाल्यानंतरही परभणी येथील नवा मोंढा भागातील बहुतांश दुकानदारांनी आम्हाला कोणतेही निर्देश प्राप्त झाले नाहीत, असे सांगत नवीन दरानेच खताची विक्री केली आहे.
-बाळासाहेब जाधव, शेतकरी, पारवा
खरिपाचे लागवड क्षेत्र
५,२१,०००