यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मागील आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले आणि जोरदार पाऊस होत आहे. मागील तीन दिवसांपासून सलग पाऊस होत असल्याने आता खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील ओढ्या -नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ५६.२ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात एकूण ३९ महसूल मंडळे असून त्यापैकी १० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पालम मंडळात सर्वाधिक १७४.५ मिमी, चाटोरी मंडळात १२९.५ मिमी, पेठ शिवणी १२८.५, परभणी ६७.३, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव ९६.३, पिंपळदरी ६५.३, पूर्णा तालुक्यातील ताडकळस ६६.८, सेलू तालुक्यातील कुपटा ९४.८, सोनपेठ ८३.८ आणि शेळगाव मंडळात ६७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
या अतिवृष्टीमुळे गावागावातून वाहणाऱ्या ओढ्यांना पूर आला असून, रस्ते वाहतुकीसाठी ठप्प झाले आहेत. जिल्ह्यात सरासरी ५६.२ मिमी पाऊस झाला आहे. त्यात परभणी तालुक्यात ४९, गंगाखेड ६७.८, पाथरी ५२.१, जिंतूर ३५.६, पूर्णा ४७.३, पालम १०६.९, सेलू ६०, सोनपेठ ६१.३ आणि मानवत तालुक्यात ४६.५ मिमी पाऊस झाला