जिंतूर :तालुक्यातील ग्रामीण भागात ४५ ठिकाणी बोगस डॉक्टरांनी आपले दवाखाने थाटले आहेत. विशेष म्हणजे आरोग्य विभागाने या डॉक्टरांविरुद्ध मोहीम राबवून कारवाई केली. मात्र, फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे.
जिंतूर तालुक्यामध्ये १७० गाव आहेत. यापैकी जवळपास १२३ गावांमध्ये बनावट डिग्री घेतलेले किंवा एखाद्या शहरातील डॉक्टरकडे कंपाैंडर म्हणून काम करणाऱ्यांनी चक्क ग्रामीण भागातील नागरिकांना औषध उपचार देण्यास सुरुवात केली आहे. मागील अनेक दिवसांपासून हा गोरख धंदा ग्रामीण भागात बिनबोभाट सुरू आहे. सध्या साथीच्या रोगाने थैमान घातलेले असताना प्रत्येकाला जीव वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे. अशा या महामारीमध्ये ग्रामीण भागात अक्षरश: लूट चालू आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थ शहरातील रुग्णालयात आल्यास त्यास तातडीने अँटीजेन किंवा आरटीपीसीआर करण्याचा सल्ला जिंतूर येथील वैद्यकीय व्यावसायिक देतात. त्यामुळे ही झंझट नको म्हणून अनेकजण गावातील डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा प्रयत्न करतो. केवळ लक्षणावरून टेस्ट न करता उपचार करण्याऐवजी निष्ठावंत डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला. तर रुग्णांची संख्या वाढत नाही. परंतु, हे बनावट डॉक्टर सलाईन व वेदनाशामक गोळ्यांचा आधार घेऊन ग्रामीण भागातच उपचार सुरू करतात. परिणामी, आठ दिवसांनंतर रुग्णाच्या छातीत कफ वाढून कोरोनाचा रुग्ण ऑक्सिजन लेवलवर जातो. शेवटी वेळ न मिळाल्याने रुग्णाची वाईट अवस्था होते. ही सर्व परिस्थिती टाळायची असेल तर प्रशासनाने आता ग्रामीण भागातील दवाखान्याकडे विशेष लक्ष देऊन डॉक्टरांची ही बोगसगिरी तातडीने बंद करावी लागणार आहे. अन्यथा कोरोनाच्या रुग्णांमध्ये हजारोंच्या संख्येने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यातील वझर भागात जवळपास ३५ ते ४० बोगस डॉक्टर असून वाघी धानोरा, अंबरवाडी, कावी, धमधम, येलदरी, आडगाव बाजार, आसेगाव, दुधगाव, कौसडी, चारठाणा या भागांमध्ये जवळपास १२५ ते १५० बोगस डॉक्टर आहेत. या महामारीत बोगस डॉक्टरांचे चांगभले झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा हा बोगस डॉक्टरांचा डाव जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्षित केल्याचे दिसत आहे.
५२ डॉक्टरांचा शोध घ्यावा
तालुका प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील ५२ बोगस डॉक्टरांवर जिंतूर ,बामणी, बोरी ,चारठाणा पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले होते. प्रशासनातील दिरंगाई, कायद्यातील त्रुटीचा आधार घेऊन या डॉक्टरांवरील कारवाई बारगळली. परंतु, त्यानंतर या डॉक्टरांनी उघडपणे त्यांच्या भागांमध्ये स्वतःचे दवाखाने काढून लूटमार सुरू केली आहे. ग्रामीण भागात या महामारीच्या काळात डॉक्टरांची लूटही सामान्यांसाठी घातक ठरत आहे.