नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी
परभणी : सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने कापूस व सोयाबीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी लाभार्थी शेतकऱ्यातून होत आहे.
प्रचार, प्रसाराला दिली बगल
परभणी : मुद्रा योजनेच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शासनाकडून ठोस निधीही उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून बेरोजगारांचे मेळावे घेेणे, जाहिरातीच्या माध्यमातून योजनेचा प्रचार करणे अपेक्षित आहे. मात्र, त्याला बगल दिली जात आहे.
नियंत्रण नसल्याने निकृष्ट काम
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने बांधलेल्या दोन्ही इमारतींचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. दीड-दोन वर्षांत या इमारतीची दुरवस्था झाल्याने कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हे काम झाले आहे. मात्र, एका वर्षात फरशा उखडणे, स्लॅब उखडण्याच्या घटना घडल्या आहेत.
वृक्ष संवर्धनासाठी पाणी नियोजन गरजेचे
परभणी : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी वृक्ष लावण्यात आले आहेत. मात्र, या वृक्षांना पाणी मिळत नसल्याने ही रोपे जागेवरच जळून जात आहेत. त्यामुळे वन विभागाने वृक्ष संवर्धनासाठी शाश्वत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, तरच वृक्ष लागवड मोहिमेचा खरा अर्थ सार्थ होण्यास मदत होईल.
एका खाटेवर दोन रुग्ण
परभणी : जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्णालय, ऑर्थो विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्डांमध्ये एका खाटावर दोन रुग्ण ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचार घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर, काही वार्डांमध्ये साफसफाईचाही अभाव दिसून येत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
अकरा कलमी कार्यक्रमाला दिला खो
परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे एकत्र करून ११ कलमी कार्यक्रम समृद्ध महाराष्ट्र योजनेच्या नावाखाली राबविण्यात आला. मात्र, कामाची मुदत संपूनही जिल्ह्यातील बहुतांश कामे अपूर्ण आहेत.
लाभार्थ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी
परभणी : महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना तत्काळ राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत तत्काळ कर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.
वाडीपाटी ते गाव रस्त्याची दुरवस्था
ताडकळस : पूर्णा तालुक्यातील ताडकळस परिसरातील वाडी पाटी ते गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे जि.प.च्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.