परभणी : म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराच्या त्वरित निदानासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पथक स्थापन करावे, अशी सूचना आ.डॉ. राहुल पाटील यांनी येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना केली आहे.
म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे असलेले काही रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. याच अनुषंगाने सोमवारी रात्री आ.डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या आजारासंदर्भातील आढावा घेतला. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डाॅ.संजय कुंडेटकर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डाॅ.विवेक नावंदर, नंदकुमार पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.दुर्गादास पांडे, डाॅ.संजय मस्के आदींची उपस्थिती होती.
म्युकरमायकोसिस हा गंभीर स्वरुपाचा आजार आहे. त्याची लक्षणे काही रुग्णांना जाणवत आहेत. या रुग्णांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. आजाराचे त्वरित निदान झाल्यास रुग्णांना त्याचा फायदा होईल. तेव्हा रुग्णांवर उपचारासाठी कान, नाक, घसा तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. त्यावर या पथकाची नियुक्ती करावी. रुग्णालयाच्या वतीने वरिष्ठांकडे तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना आ.डाॅ.पाटील यांनी दिल्या.
नातेवाईक ठरतात कोरोना स्प्रेडर
येथील कोविड रुग्णालयात नातेवाईक बिनधास्तपणे प्रवेश करीत आहेत. रुग्णाजवळ थांबतात, त्यानंतर याच ठिकाणाहून शहरात इतरत्र फिरतात. त्यामुळे नातेवाईकांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नातेवाईकांना रुग्णालयात प्रवेश न देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांच्या परवानगीने पीपीई किट परिधान करुनच प्रवेश द्यावा. नातेवाईक संशयित असेल तर याच ठिकाणी नातेवाईकांचीही आरटीपीसीआर व ॲन्टिजन तपासणी करण्याची सुविधा निर्माण करण्याचेही या बैठकीत ठरले.