परभणी : पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्ती देण्यासंदर्भात जाहिरात काढण्यास महाज्योतीकडून टाळाटाळ केली जात असल्याने संशोधक विद्यार्थी मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत.
महाराष्ट्र शासनाने मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. सारथी आणि बार्टी या संस्थांच्या धर्तीवर महाज्योती या संस्थेची स्थापना झाली आहे. महाज्योती संस्थेमार्फत विविध बाबींसाठी अधिकृत जाहिरात काढून संशोधक विद्यार्थ्यांसाठी निधी किंवा अधिछात्रवृत्ती मंजूर केली जाते. महाज्योतीच्या स्थापनेनंतर नुसताच घोषणांचा पाऊस झाला; परंतु त्याची अंमलबजावणी मात्र अद्यापपर्यंत झाली नाही. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ८ जानेवारी २०१९ रोजी पीएच. डी. पात्र विद्यार्थ्यांसाठी लवकरच जाहिरात काढली जाईल, अशी घोषणा केली होती; मात्र अद्यापपर्यंत ही जाहिरात न काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
परभणीतील काही संशोधक विद्यार्थ्यांनी या संदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे. महाज्योती संस्थेने संशोधक विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्ती देण्याच्या झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. मात्र, दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही संबंधित अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप संशोधक विद्यार्थ्यांनी केला आहे. महाज्योतीसाठी पूर्णवेळ अध्यक्षाची नियुक्ती करावी तसेच व्यवस्थापकीय संचालक यांना या पदावरून हटवावे, अशी मागणी संशोधक विद्यार्थी करत आहेत. या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटना, संशोधक विद्यार्थी संघटना आणि काही सामाजिक संघटनांनी आता पाठपुरावा सुरू केला आहे.