लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात १ मेपासून १८ वर्षांपुढील ७ लाख ९० हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असली तरी आतापर्यंत ४५ वर्षांपुढील फक्त १९ टक्के नागरिकांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्याच्याच मोहिमेत लसीची कमतरता भासत असल्याने तिसऱ्या टप्प्याकरिता लस मिळविण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने आतापर्यंत १ लाख २२ हजार ४९८ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामध्ये १ लाख १० हजार ३४७ नागरिकांना पहिला तर १२ हजार १५१ नागिरकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ६ लाख ४८ हजार नागरिकांना हे लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी फक्त १९ टक्केच उद्दिष्ट आतापर्यंत पूर्ण झाले आहे. आता १ मेपासून १८ वर्षापुढील कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे, असे जिल्ह्यात ८ लाख २० हजार ३१० नागरिक आहेत. या नागरिकांना लस उपलब्ध करताना प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.
तीन दिवसांचाच साठा
जिल्ह्याला दोन दिवसांपूर्वी २ हजार ५१७ कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड लस मिळाली. हा साठा जवळपास संपत आला आहे.
बुधवारी सायंकाळपर्यंत ९ हजार लसींचा साठा जिल्ह्याला औरंगाबादहून उपलब्ध होणार आहे. ही लसही तीन दिवसच पुरणार आहे. त्यामुळे तीन दिवसांनंतर पुन्हा लसीकरणात खंड पडण्याची शक्यता आहे.
४५ पेक्षा जास्त वयाचे १९ टक्केच लसीकरण
४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ८५ हजार १७४ नागिरकांना पहिला डोस देण्यात आला आहे.
तसेच याच वयोगटातील ४ हजार ८३५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
ज्येष्ठही मागेच
जिल्ह्यात ६० वर्षांवरील २ लाख ६५ हजार ७४४ नागरिकांची संख्या आहे. यातील ५० टक्केही नागरिकांनी काेरोनाची लस घेतलेली नाही.
त्यामुळे लसीकरणात ज्येष्ठ नागरिकही मागेच असल्याचे दिसून येत आहे.
दुसऱ्या डोसचे काय?
जिल्ह्यात कोरेाना प्रतिबंधात्मक लसीचा १ लाख १० हजार ३४७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असताना दुसरा डोस मात्र फक्त १२ हजार १५१ नागरिकांनी घेतला आहे.
त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या ९ हजार ५७४ आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ३ हजार ७६१ कर्मचाऱ्यांनीच दुसरा डोस घेतला आहे.
तसेच १५ हजार ५९९ फ्रंटलाईन वर्कर्स पैकी ३ हजार ५५५ जणांनीच दुसरा डोस घेतला आहे.
त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील पहिल्या टप्प्यामधील १७ हजार ८५७ कर्मचाऱ्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही.
लसीकरण केंद्रेही वाढवावी लागणार
१ मे पासून १८ वर्षांपुढील जिल्ह्यातील जवळपास ८ लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. १ मेपासून मात्र प्रशासनाला लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करावी लागणार आहे. याचे नियोजन सद्यस्थितीत जिल्हास्तरावर झालेले नाही.