परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षभरात तब्बल ३३ हजार बालकांचे विविध प्रकारचे डोस रखडले होते. हा संसर्ग कमी झाल्यानंतर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला असून, २६ हजार २२० बालकांना लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
बालक जन्माला येताच सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच या बालकांना विविध प्रकारचे प्रतिबंधात्मक डोस दिले जातात. टप्प्याटप्प्याने १६ महिन्यांपर्यंत हे लसीकरण केले जाते. मात्र, मागील वर्षी एप्रिल महिन्यात जिल्ह्यात लॉकडाऊन पुकारण्यात आले. कोरोनाच्या संसर्गामुळे शासकीय रुग्णालयांबरोबरच खाजगी रुग्णालयांमध्येही बालकांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. नागरिक घराबाहेर पडत नव्हते. शिवाय, कोरोनाच्या भीतीमुळे दवाखान्यांमध्ये जाणेही अनेकांनी टाळले. परिणामी, या बालकांचे लसीकरण रखडले होते. शासकीय स्तरावरही सर्व यंत्रणा कोरोनाचा प्रतिबंध करण्यात गुंतली असल्याने बालकांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष झाले. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यापूर्वीच्या काळात लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने नागरिक घरातच बसून होते. दवाखान्यात जाण्याचीही भीती नागरिकांच्या मनात होती. या सर्व पार्श्वभूमीवर नवजात बालकांना शासकीय रुग्णालयांत जाऊन डाेस देणे जिकिरीचे असल्याने अनेकांनी नवजात बालकांनाही डोस दिले नाहीत. याशिवाय, खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोनाच्या संसर्गामुळे दक्षता घेतली जात होती. परिणामी, बालकांना द्यावयाचे सर्व डोस लांबणीवर पडले.
जुलै महिन्यानंतर हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, असली तरी प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यातच सर्व व्यवहार पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने डिसेंबर महिन्यात बालकांच्या लसीकरणाची मोहीम सुरू केली. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हास्तरावर देण्यात आले. परभणी जिल्ह्यासाठी ३३ हजार ७०२ बालकांना ही लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. डिसेंबरअखेरपर्यंत २६ हजार २२० बालकांना डोस देण्यात आले आहेत. आणखी आरोग्य विभागाकडे एक महिन्याचा कालावधी शिल्लक असून, या काळात उर्वरित सात हजार ४८२ बालकांचे लसीकरणही पूर्ण होईल, अशी आशा आहे.
३३ हजार ८७९ बालकांना लसीकरण
२०१९ मध्ये आरोग्याच्या कोणत्याही अडचणी जिल्ह्यात नव्हत्या. यावर्षीही जिल्हा प्रशासनाला ३३ हजार ७०२ बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्या तुलनेत ३३ हजार ८७९ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत १०१ टक्के लसीकरण आरोग्य विभागाने पूर्ण केले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमधून तसेच घराेघर फिरून हे लसीकरण केले जाते. मागील वर्षी लसीकरणाचा हा टप्पा पूर्ण झाला होता.
महिनाभरात उद्दिष्ट गाठू
जिल्ह्यात बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट येत्या दीड महिन्यामध्ये पूर्ण केले जाईल. डिसेंबर महिन्यापासून शहरी आणि ग्रामीण भागात बालकांचे लसीकरण केले जात आहे. त्यास प्रतिसादही मिळत आहे.