गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा येथील पैनगंगा नदीवरील पुलाच्या कठड्यांचे व दोन्ही बाजूच्या भराव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. हे काम अर्धवट अवस्थेत सोडून संबंधित कंत्राटदाराने गाशा गुंडाळला आहे.
परिणामी कठड्याअभावी पूल रस्त्यावर अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर रस्ता वाहतुकीस व नियमित ये-जा करणार्या शालेय विद्यार्थ्यांसाठी धोक्याचा झाला आहे. याबाबत पाठपुरावा केला असता कंत्राटदार अंग काढून घेण्याचा पवित्रा अवलंबत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. सदर निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मराठवाडा- विदर्भाला जोडणार्या सूरजखेडा शिवारातील पैनगंगा नदीवरील पुलाचे काम गतवर्षी पूर्ण होऊन वाशिम-गोरेगाव बसफेर्या व इतर वाहतूक सुरू झाल्याने परिसरातील जनसामान्यांसाठी सोयीचे झाले आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराने पुलावरील कठड्यांचे व दोन्ही बाजूच्या भराव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करीत अर्धवट अवस्थेत सोडून आपला गाशा गुंडाळल्याने पूल रस्ता वाहतुकीस धोक्याचा झाला आहे. पुलावर कठड्यासाठी उभारलेल्या सिमेंट ठोकळय़ांमध्ये मातीमिo्रीत वाळू, लोखंडी गज सिमेंटचा कमी वापर केल्याने ठोकळय़ांची अवस्था ठिसूर होवून ते पुलाखाली गळून पडू लागले आहेत.
या ठोकळय़ांवर थातूरमातूर पद्धतीने बसवलेले लोखंडी तुकडेही चोरीला गेले आहेत. कंत्राटदाराने कठड्याचे काम निकृष्ट दर्जाचे करीत बंद अवस्थेत असल्याने पूल कठड्याअभावी उभा आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूस भराव कामात कुचराई करण्यात आली असून, अपेक्षित प्रमाणात भराव न टाकता टोळदगडाचा वापर कमी प्रमाणात केल्याने भराव ढासाळून पडण्याची शक्यता दिसून येत आहे. ुपुरेशा भरावअभावी रस्ता खोल उथळ, खडतर झाला आहे. सदर खडतर खोल उथळ रस्त्यावर वाहने घसरण्याची शक्यता आहे. त्यातच पुलाला कठडे नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. कठड्याअभावी वाहतूक व सुरजखेडा येथून नदी पार करीत कोकलगाव येथे शिक्षणासाठी नियमित ये-जा करणार्या शालेय विद्यार्थ्यांसाठी पूल धोकादायक झाला आहे.
सुरजखेडा येथील ग्रामस्थांनी सदर पुलावरील कठड्याच्या व बाजू भराव रस्त्याच्या निकृष्ट कामाची दुरूस्ती करून अर्धवट अवस्थेतील काम पूर्ण करण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा, विनंत्या केल्या. तरीही संबंधित कंत्राटदार सदर पूल प्रशासनाच्या स्वाधीन केल्याचे सांगत अंग काढून घेण्याचा पवित्रा अवलंबत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
सदर पुलाचे काम अपूर्ण असताना प्रशासनाने पूल ताब्यात कसा घेतला? असा प्रश्न ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. सदर निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार कारवाईची मागणी होत आहे. /(वार्ताहर)
दुरवस्था.. : सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा शिवारात असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे गायब झाल्याने वाहनधारकांना धोका आहे.
■ नदी-नाल्यांवरून प्रवास करताना वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी कठडे बसविण्यात येतात.
> सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा परिसरात पैनगंगा नदीवर पूल बांधला आहे.
> सदर पुलाच्या दोन्ही बाजूने कठडे बसविण्यात आले होते. परंतु सद्य:स्थितीत हे कठडे तुटल्याने धोका वाढला आहे.
> संबंधित कंत्राटदाराने कामच अर्धवट सोडल्याने कारवाईची मागणी होत आहे.