परभणी - शहरातील काळी कमान, खानापूर फाटा याशिवाय कॅनॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंबेडकरी चळवळीतील समर्थकांनी टायर जाळून संविधान प्रकरणाचा निषेध केला. तसेच या सर्व ठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याने वाहने त्या त्या भागात थांबलेली आहेत.
बाजारपेठ पूर्णपणे बंद
परभणी शहर बंदची हाक दिल्याने आज शहरातील सर्व बाजारपेठ बंद असल्याचे पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होऊन आपली प्रतिष्ठान बंद ठेवली. शहरातील कोणत्याच भागात कोणतेच दुकान सुरू असल्याचे पाहायला मिळाले नाही.
शहरभर चोख पोलीस बंदोबस्त
परभणी शहरात विविध भागात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. विविध ठिकाणी टायर जाळण्याच्या घटना घडत असून अशा प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. याशिवाय गस्तीची वाहनही शहरात फिरताना दिसत आहेत. शहराबाहेर वाहतूक थांबविण्यासाठीही पोलिस यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून आले.
नेमकं प्रकरण काय?
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामार्गाजवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. पुतळ्याचे मागील काही महिन्यापूर्वी सुशोभीकरण केले होते. पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर भारतीय संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. ही संविधानाची प्रतिकृती मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका इसमाने जागेवरून काढली. ही बाब माहीत होताच संबंधित इसमाला परिसरातील जमाव, युवक, नागरिक यांनी चोप दिला. या प्रकारानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात शेकडो युवक, आंबेडकर प्रेमी नागरिक यांच्यासह जमाव जमला होता.