परभणी : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये जिल्ह्याने राज्यात सहावा क्रमांक पटकावला असून, आतापर्यंत ७ लाख ६७ हजार ४५३ नागरिकांचे संपर्क शोधण्यात आले आहे.
कोरोनाबाधित नागरिकांच्या संपर्कात आल्यानंतर संबंधित नागरिकालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो आणि हा नागरिक इतरांना कोरोनाबाधित करण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना शोधून त्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. या कामी आरोग्य कर्मचाऱ्यांसह शिक्षक, तलाठी, लिपिक आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्ह्यात हे काम अतिशय परिणामकारक झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार १२१ बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यांच्या संपर्कातील ७ लाख ८० हजार ५३५ नागरिकांना शोधण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर होते. आतापर्यंत ७ लाख ६७ हजार ४५३ नागरिकांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आले आहे. ५ हजार ९११ नागरिकांचे मात्र कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रशासनाकडे उपलब्ध झाले नाहीत. त्याचे प्रमाण केवळ १५.५८ टक्के एवढे आहे. जिल्ह्यात ७ लाख ६७ हजार नागरिकांचे संपर्क शोधण्यात प्रशासनाला यश आले असून, राज्याच्या कामगिरीत जिल्ह्याने सहावा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधणाऱ्या पहिल्या सहा जिल्ह्यांत मराठवाड्यातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे.
१४ हजार नागरिकांना आढळली लक्षणे
कोरोनाचा संसर्ग थोपविण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा मोठा फायदा झाला आहे. कर्मचाऱ्यांनी शोधलेल्या ७ लाख ६७ हजार ४५३ नागरिकांमध्ये २ लाख ८३ हजार २४० नागरिक हायरिस्क संपर्कातील होते, तर ४ लाख ९७ हजार ४९५ नागरिक लो रिस्क संपर्कातील होते. शोधलेल्या संपर्कापैकी १४ हजार ३४८ नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. या नागरिकांना वेळेत रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर
कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा महत्त्वपूर्ण घटक आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधण्यात नांदेड जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली असून, प्रथम क्रमांक मिळविला आहे. या जिल्ह्यात ८८ हजार ६५९ बाधित रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १८ लाख ११ हजार ७९० नागरिकांना शोधण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर होते. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी १७ लाख ९९ हजार ७२४ नागरिकांचा शोध घेतला. त्यात हायरिस्कमधील ८ लाख ३३ हजार ३८० आणि लो रिस्कमधील ९ लाख ७८ हजार ४१० नागरिकांचा समावेश आहे. शोधलेल्या नागरिकांमध्ये ५१ हजार ३८१ नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. केवळ २ हजार ७३६ रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या जिल्ह्याला शोधता आले नाहीत.
नांदेडपाठोपाठ जालना जिल्ह्याने राज्याच्या यादीत दुसरा, तर बीड जिल्ह्याने पाचवा क्रमांक मिळविला आहे. पहिल्या १० मध्ये लातूर जिल्हा नवव्या क्रमांकावर आहे.