परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २३ मार्च रोजी मतमोजणी होणार असून, प्रशासनाने मतमोजणीची पूर्ण तयारी केली आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या २१ संचालकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली ७ संचालक यापूर्वीच बिनविरोध झाल्याने रविवारी १४ संचालकांसाठी मतदान घेण्यात आले. ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत ९९ टक्के मतदारांनी मतदानाचा सहभाग नोंदविल्याने निकालाची उत्कंठा लागली आहे. शहरातील जायकवाडी परिसरातील कल्याण मंडपम येथे २३ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सुरुवातीला विविध कार्यकारी सेवा सोसायटी संयुक्त शेती धन्य अधिकोष सहकारी संस्था मतदार संघाची तालुकानिहाय मतमोजणी होणार आहे. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात इतर शेती संस्था मतदारसंघ, महिला प्रतिनिधी मतदारसंघ, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मतदारसंघ, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ आणि सर्वात शेवटी विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातील मतांची मोजणी केली जाणार आहे.
मतमोजणीसाठी प्रशासनाने एकूण ५३ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुरू केली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वसाधारणपणे निकाल हाती लागेल, अशी अपेक्षा आहे. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत राजकीयदृष्ट्या ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून, निकालाची उत्सुकता लागली आहे.