तथागत गौतम बुद्धांनी मानवाला समता, करुणा, मैत्री, शांततेचा संदेश दिला. प्रियदर्शी राजा सम्राट अशोकांनी बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जगात ८४ हजार बुद्ध विहारांची निर्मिती केली. धम्माचा प्रसार होण्यासाठी प्रसिद्ध सिने अभिनेता गगन मलिक यांनी ८४ हजार बुद्ध मूर्तिदान करण्याचा संकल्प केला आहे. बुद्धमूर्ती वाटप कार्यक्रमाची सुरुवात बुद्धगया येथील महाबोधी विहार येथून करण्यात आली आहे. आत्तापर्यंत विविध ठिकाणी सुमारे ४ हजार मूर्ती दान करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने परभणी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १७ सप्टेंबर रोजी व्हिएतनाम येथील २५० बुद्ध मूर्ती वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, परंतु राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जाहीर कार्यक्रम घेऊ नये, असे आवाहन केल्याने परभणीतील १७ सप्टेंबरचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी दिली.
परभणीतील बुद्धमूर्ती वाटपाचा कार्यक्रम पुढे ढकलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST