परभणी : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ३१ मेपर्यंत लागू केलेली संचारबंदी आता १६ जूनपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. या काळात किराणा आणि फळ, भाजी विक्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची सवलत दिली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने १ जूनपासून बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरू होतील, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. या दरम्यानच्या काळात राज्य शासनाने पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये संचारबंदीत अधिक सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. परभणी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला असल्याने जिल्ह्यात सवलती वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी सायंकाळी संचारबंदीचे नवे आदेश काढले. त्यानुसार जिल्ह्यात १६ जूनपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. या काळात केवळ किराणा दुकान आणि फळ, भाजी विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यासाठी पूर्वीच्या वेळेपेक्षा तीन तास अधिकची सवलत दिली आहे. पूर्वी सकाळी ७ ते ११ या वेळेत ही दुकाने सुरू होती. आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहणार आहेत. तसेच प्रत्येक शनिवार आणि रविवार संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने कृषी दुकानांसाठीही वाढीव सवलत दिली आहे. पूर्वी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत कृषी दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश होते. आता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कृषी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे दोन बदल वगळता पूर्वी असलेल्या संचारबंदीमध्ये फारसा बदल करण्यात आला नाही. त्यामुळे बाजारपेठेतील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होण्यासाठी १६ जूनपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवा, शासकीय, निमशासकीय कार्यालयांची वाहने, अधिकारी कर्मचारी, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, पेट्रोल पंप व गॅस वितरक, लसीकरण, आरटीपीसीआर, रॅपिड तपासणी करणारे नागरिक, स्वस्त धान्य दुकाने, ई-कॉमर्स सेवा, औद्योगिक कारखान्यात काम करणारे कामगार यांना संचारबंदीत सूट दिली आहे. तसेच दूध विक्रेत्यांना सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत, तर दूध डेअरी चालकांना सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत आठवड्याचे सर्व दिवस दूध विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास
कोरोना संसर्ग कमी झाल्याने आणि जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याने किमान काही काळासाठी तरी बाजारपेठेतील इतर दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळेल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले होते; परंतु किराणा व भाजीपाला विक्रीच्या दुकानांना दिलेला वाढीव वेळ वगळता इतर व्यावसायिकांची दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.