लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू, देवगाव फाटा : डोक्यात वीट घालून दिराने भावजयीचा खून केल्याची घटना १४ एप्रिल रोजी सकाळी ८.३०च्या सुमारास तालुक्यातील तळतुंबा येथे घडली असून, या घटनेनंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
तालुक्यातील तळतुंबा येथील आशामती परसराम घुले (वय ४२) आणि त्यांचा दीर मारोती घुले हे एकाच वाड्यात मात्र वेगवेगळे राहात होते. १४ एप्रिल रोजी सकाळी आशामती आणि मारोती घुले यांच्यात वाद झाला. या वादातून मारोती याने आशामती यांच्या डोक्यात वीट मारली. त्यात आशामती या गंभीर गंभीर जखमी झाल्या. जखमी आशामती यांना सुरुवातीला सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर परभणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आशामती यांचा मृत्यू झाला. घरगुती आणि मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल, पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे, पोलीस उपनिरीक्षक माधव लोकुलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, आरोपी मारोती घुले हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांनी सांगितले.