परभणी : लॉकडाऊन काळात कामगारांसाठी राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली असली, तरी जिल्ह्यातील गटई कामगारांना अद्याप ही मदत मिळालेली नाही. त्यामुळे गटई कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरात सुमारे २०० ते ३०० गटई कामगार आहेत. छोटेखानी व्यवसाय करून हे कामगार आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात. मात्र, मागील एक महिन्यापासून संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद आहे. त्याचा परिणाम कामगारांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. आर्थिक उत्पन्न नसल्याने कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच राज्य शासनाने कामगारांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे; परंतु प्रत्यक्षात घोषणा होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला तरीही या कामगारांना मदत मिळालेली नाही. प्रशासनाने गटई कामगारांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
त्वरित अनुदान जमा करावे
रस्त्याच्या बाजूने बसून काम करणाऱ्या गटई कामगारांना शासनाने अद्यापही ठोस मदत जाहीर केली नाही. सध्या या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या कामगारांना अनुदान वितरित करावे.
विश्वास फुलपगार
अध्यक्ष, संत रविदास बहुजन क्रांती दल