लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोनाच्या साथीपुढे डेंग्यू, मलेरिया या पारंपरिक साथींनीही पाठ फिरविली असून, या साथींच्या आजाराचे रुग्ण घटले आहेत.
उन्हाळाच्या अखेरच्या टप्प्यातच वातावरण बदलामुळे आणि पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात. दरवर्षी आरोग्य विभागाला या साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाला विशेष प्रयत्न करावे लागत होते; मात्र मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीने जिल्हावासीयांना ग्रासले आहे. या साथींचा बंदोबस्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या नाकीनऊ आले; मात्र कोरोनाच्या साथीपुढे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने उद्भवणारे साथीचे आजार मात्र यंदा गायब झाल्याचे दिसत आहे. जिल्हा हिवताप विभागाने या साथी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाभरात नागरिकांच्या तपासण्या केल्या; मात्र त्यातील पॉझिटिव्ह नमुने बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या साथीपुढे पारंपरिक साथींच्या आजारानेही हात टेकल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
नागरिकांनी काय घ्यावी काळजी
n घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. आठवड्यातून किमान दोन वेळेस पाणीसाठे रिकामे करून घासून, पुसून घेऊन कोरडी करावीत. त्यानंतरच त्यात पाणी भरावे.
nटायर व निररुपयोगी भंगार साहित्य घराबाहेर, छतावर ठेवू नये, त्यामध्ये पावसाचे पाणी साठून डासोत्पत्ती होते. डासांना पळवून लावणाऱ्या साधनांचा वापर करावा.
डबक्यांमध्ये गप्पी मासे
पावसाळ्यात मलेरिया होऊ नये, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर गप्पी मासे पैदास केंद्र सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार हे केंद्र सुरू केले जाणार आहे.
गावातील आणि परिसरातील डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याची मोहीमही हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती थांबेल.
डेंग्यू, मलेरिया हे साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी करण्यात आली आहे. सी.एच.ओ., एम.पी. डब्ल्यू यांच्या मार्फत प्रत्येक आठवड्याला सर्वेक्षण केले जात असून, गावा-गावात जनजागृती केली जात आहे.
डॉ.व्ही.आर. पाटील,
- हिवताप अधिकारी.