वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथील विद्युत तारा व मोडकळीस आलेले खांब तत्काळ बदलावेत, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनाद्वारे केली.
वालूर येथे मागील अनेक वर्षांपासून विद्युत तारा व मोडकळीस आलेले खांब बदलण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा या तारा तुटून जमिनीवर पडल्या आहेत. या विद्युत तारा बदलण्यासाठी अनेक वेळा वीज वितरण कंपनीकडे तक्रारी करूनही अद्यापपर्यंत याबाबत महावितरण कंपनीने ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे तत्काळ विद्युत तारा बदलाव्यात, अशी मागणी उपकार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर रमेश धापसे, मधुकर क्षीरसागर, बाळू देशमाने, बापू सोनवणे, अरुण क्षीरसागर, बंडू तळेकर, श्यामा क्षीरसागर, गजानन देशमाने, विष्णू धापसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.