परभणी : दोन वर्षांपूर्वी संघर्षातून उभारलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आजही समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. महाविद्यालयासाठी ३९१ पदे मंजूर असतानाही केवळ ११ पदांची भरती शासनाने केली आहे. उर्वरित तब्बल ३८० पदे रिक्त असून, रुग्णसेवा आणि अध्यापन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे.
शासकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होण्यास अवधी बाकी आहे. तर, दुसरीकडे प्रथम आणि द्वितीय या दोन वर्षातील दोनशे विद्यार्थ्यांना शिकविण्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसेवा देण्यासाठी डॉक्टर्स व कर्मचारी यांची गरज भासते. त्यामुळे शासनाने आतापर्यंत नियमित पदे भरणे आवश्यक होते. मात्र, शासनदृष्ट्या मागासलेल्या परभणीकरांना प्रत्येक गोष्ट शासनाशी भांडूनच घ्यावी लागते. वैद्यकीय अधीक्षक, उपवैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह अधिपरिचारिकांपर्यंत २८ प्रकारची ३९१ पदे संवर्गनिहाय नियमित मंजूर करण्यात आली. तृतीय वर्षासाठी काही महिने शिल्लक असतानाही नियमित पूर्ण पदे भरण्यात आलेली नाहीत. ३९१ पैकी केवळ ११ पदे नियमित भरून शासनाने परभणीकरांची बोळवण केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापनात अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसेवा देण्यासाठी या डॉक्टरची कमी भासत आहे. त्यामुळे परभणीकरांना संघर्षविना मंजूर पदे तत्काळ वैद्यकीय विभागासह शासनाने लक्ष घालून भरावीत, अशी मागणी आता सामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
अध्यापनात अडथळा, रुग्णसेवेत खोळंबामहाविद्यालयात प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी २०० विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. मात्र, पुरेशा शिक्षक आणि कर्मचारी अभावामुळे अध्ययन-अध्यापनात मोठा अडथळा येत आहे. यासोबतच, जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसेवेची जबाबदारी देखील या अपुऱ्या मनुष्यबळावर निभवावी लागत आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सर्व भाररुग्णसेवा आणि अध्यापनासाठी लागणारी बहुसंख्य पदे रिक्त असल्याने सध्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांवरच सर्व भार आहे. विशेष म्हणजे, ३९१ पैकी २४६ पदे केवळ अधिपरिचारिकांची आहेत. परंतु, या जागांवरही बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी स्वरूपात भरती करण्यात आली आहे.
३८० पदे रिक्तशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम व द्वितीय वर्षाकरिता नियमित पदे ही ३९१ एवढी लागणार आहेत. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक, उपवैद्यकीय अधीक्षकासह क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, औषध निर्माता, कनिष्ठ लिपिक, वीजतंत्री, प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, अधिपरिचारिका यासह आदी पदांचा समावेश आहे. मात्र, शासनाने केवळ निवासी वैद्यकीय अधिकारी २, वरिष्ठ सहायक २, वरिष्ठ लिपिक ५ असे एकूण ११ जणांना नियमित नोकरी दिली आहे. मात्र, ३८० पदे हे रिक्त आहेत. त्यामुळे कंत्राटींवरच रुग्णसेवेसह अध्यापनाचे कार्य सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू आहे.