आ.रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या विकासनिधीतून परभणी जिल्ह्यासाठी तीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आ.रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, डॉ.प्रकाश डाके, माधवराव गायकवाड, हनुमंत मुंडे, रवि कांबळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले, कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकांना अत्यंत महत्त्व आहे. सध्या जिल्ह्यात रुग्णवाहिका कमी पडत होत्या. कोणत्याही रुग्णाला रुग्णवाहिकेसाठी थांबावे लागू नये म्हणून आ.रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या विकास निधीतून या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आरोग्यसेवा आणखी सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.रत्नाकर गुट्टे म्हणाले, रुग्णसेवेला प्राधान्य देत आपला निधी रुग्णवाहिकेसाठी उपलब्ध करून दिला. या रुग्णवाहिका अत्यंत गरजेच्या वेळी उपलब्ध झाल्या असून, शेकडो रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णवाहिकांचा पुरेपूर उपयोग व्हावा. प्रशासनाने प्रत्येक रुग्णवाहिकेसाठी दोन चालक आणि एक डॉक्टर नियुक्त करून २४ तास रुग्णवाहिकेची सेवा सुरू ठेवावी, अशी अपेक्षा आ.गुट्टे यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.