शहरातील धनगर गल्लीतील रहिवासी मारोतराव बापूराव भुमरे (६५) हे ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरापासून जवळच परभणी रस्त्यावर असलेल्या त्यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही. नातेवाईकांनी शहरात सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ते मिळून आले नसल्याने ८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता त्यांची पत्नी सुलोचनाबाई व नातू विवेक शिवाजी भुमरे हे शेतात गेले असता पांदण रस्त्यावर मारोतराव भुमरे हे रक्ताची उलटी होऊन मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या बाजूलाच कापसाचे गाठोडे पडलेले दिसले. त्यातच गंगाखेड शहरापासून जवळच परभणी रस्त्यावरील शेत शिवारात खून झाल्याची अफवा पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश आघाव, जमादार रंगनाथ देवकर, एकनाथ आळसे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शिवाजी मारोतराव भुमरे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार रंगनाथ देवकर तपास करीत आहेत.
कापूस वेचणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:13 IST