वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
पालम : शहरात सार्वजनिक रस्ता व विविध भागांत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरभर कोठेही रस्त्यावर वाहने बेशिस्तपणे लावली जात आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी होऊन गैरसोय वाढली आहे. तसेच वाहतूक ठप्प होत आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
रस्त्यावरील खडीमुळे वाहनधारक त्रस्त
सोनपेठ : सोनपेठ-परळी रस्त्यावरील कालव्यावर असलेल्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी त्यामध्ये खडी टाकण्यात आली आहे. ही खडी मोठ्या स्वरूपातील असल्याने त्यातून वाहने नेताना वाहनधारकांच्या नाकीनव येत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गंगाखेड शहरातील विद्युत दिवे बंद
गंगाखेड : गंगाखेड येथील परळी नाका ते बसस्थानक रस्त्यावरील खाबांवर असलेले काही विद्युत दिवे बंद पडले आहेत. ते काढून दुसरे विद्युत दिवे बसवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. विद्युत दिवे बदलावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
रस्त्यावर धुळीमुळे अडथळा
पाथरी : आष्टी-पाथरी या रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. रस्त्यावर काम सुरू असताना पाण्याचा वापर होत नसल्याने धुळीमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे दुसऱ्या बाजूचे काम अद्यापही अपूर्ण आहे. त्याचा फटकाही वाहनधारकांना बसू लागला आहे.
सेलू- वालूर मुख्य रस्त्यावर खड्डे
सेलू : सेलू ते वालूर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच हा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र वाळूच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे.