बहुतांश नागरिक, व्यापारी नियमाला बगल देत आपली कामे सुरूच ठेवत आहेत. कोरोनाची भीती न बाळगता सध्या सगळ्यांचा बिनधास्त वावर सुरू आहे. हीच परिस्थिती घरोघरीही दिसून येत आहे. अनेक जण किरकोळ आजार किंवा सर्दी, ताप, खोकला असला तरी बाहेर फिरत आहेत आणि अनेक जण घरात राहून आजार लपवित आहेत. यातून एखादी संसर्गात आलेली व्यक्ती बाहेरून घरापर्यंत आल्यास त्याचा धोका पोहोचू शकतो.
पार्सल वस्तू आल्यास घ्यावी काळजी
हाॅटेलमधील खाद्य पदार्थ, ऑनलाईन पद्धतीने केलेली वस्तूंची खरेदी ही ग्राहकापर्यंत पोहोचविण्याची यंत्रणा अगदी चोख पद्धतीने काम करीत असली तरी घरी वस्तू, पार्सल आल्यावर ती घराबाहेर मोकळ्या जागेत ठेवणे, सॅनिटायझेशन करणे याबाबी अनेकजण पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे धोका वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे.
घरोघरी दुरुस्तीची कामे
एकीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि दुसरीकडे वाढलेला उन्हाचा पारा यामुळे घरातील कुलर, फॅन, एसी यासह अन्य इलेक्ट्रिक साहित्य दुरुस्तीची कामे केली जात आहेत. ही कामे करण्यासाठी आता बाहेर दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी नाही. त्यामुळे हीच कामे घरी जाऊन व्यावसायिक करीत आहेत. ही कामे करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच धुणे-भांडे करण्यासाठी येणाऱ्या मोलकरीण यांच्या ये-जा बाबत काळजी घ्यावी.
ही घ्यावी काळजी
बाहेरून मागविलेल्या वस्तू घरात घेण्याआधी सॅनिटाईज कराव्यात.
मास्क घातल्याशिवाय घरात प्रवेश देऊ नये.
शक्यतो खाण्यापिण्याचे पदार्थ बाहेरून मागविणे टाळावे.
मास्कशिवाय प्रवेश देऊ नये.
घरातील कोणत्याही कामासाठी किंवा सहज घरी येणाऱ्यांपैकी कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधताना दोघांच्याही तोंडाला मास्क असणे आवश्यक आहे. सध्याचा संसर्ग हा बोलताना किंवा श्वास घेताना मास्क घातलेला नसल्यास त्यातून होण्याचा धोका जास्त आहे. प्रत्येकाने सोशल डिस्टन्सचे पालन करावे. वस्तू सॅनिटाईज कराव्यात. मात्र, मास्क घालणे टाळू नये.
डाॅ. उत्तम वानखेडे, परभणी.