गंगाखेड : संचारबंदीच्या काळात परवानगी नसताना दुकान उघडे ठेवणाऱ्या शहरातील ओमनगर कॉर्नर येथील दोन ऑटोमोबाईल्स चालकांविरुद्ध नगरपरिषदेच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरपरिषदेच्या पथकातील ज्ञानेश्वर व्यंकटराव पारसेवार, सुधीर गायकवाड, सुरेश साळवे, आदींनी २६ मे रोजी दुपारी २.३० ते २.४५ च्या दरम्यान परळी नाका परिसरातील ओमनगर कॉर्नर येथे ही कारवाई केली. संचारबंदीच्या काळात विदिशा ऑटोमोबाईल्स व श्री ऑटोपार्टस् या दुकान मालकांनी त्यांची दुकाने उघडी ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता गर्दी जमविली. परवानगी नसताना दुकाने उघडी ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर पारसेवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही दुकान मालकांविरुद्ध २६ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार दीपक भारती, दीपककुमार व्हावळे हे करीत आहेत.