परभणी : एसटी महामंडळाच्या सेवेत वाहक-चालक या पदासाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील १७८ उमेदवारांचे प्रशिक्षण कोरोनामुळे अर्धवट राहिले असून, महामंडळाच्या निर्णयाकडे या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दुष्काळग्रस्त भागासाठी वाहक-चालकांची सरळ सेवेेने भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीप्रक्रियेसाठी परभणी जिल्ह्यातील अनेक बेरोजगार उमेदवारांनी अर्ज केले. जिल्ह्यातील २०३ जागा या प्रक्रियेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. लेखीपरीक्षा, कागदपत्रांची पडताळणी आणि संगणकीय वाहन चालविण्याची चाचणी पूर्ण घेण्यात आली. या तिन्ही चाचण्यांमध्ये गुणवत्तेनिहाय पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात परभणी जिल्ह्यातील १९३ उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे या उमेदवारांना आता लवकरच नियुक्ती आदेश मिळतील, अशी अपेक्षा लागली होती.
महामंडळाच्या प्रक्रियेनुसार एस. टी. महामंडळाच्या सेवेसाठी निवड झाल्यानंतर ४५ आणि ८० दिवसांचे दोन प्रशिक्षण घेतले जातात. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आले. मात्र साधारणत: एक महिन्याचे प्रशिक्षण झाल्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे लाॅकडाऊन पुकारण्यात आले. त्यामुळे हे प्रशिक्षण बंद पडले.
राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली तरीही एस. टी. महामंडळाने अर्धवट राहिलेले प्रशिक्षण पूर्ण करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे निवडप्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी उलटला असून, या उमेदवारांना आता एस. टी. महामंडळाच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे.
१५ जणांना थेट नियुक्ती
जिल्ह्यात १९३ जणांची अंतिम निवड यादी जाहीर झाली होती. इतर विभागांत सेवा करणाऱ्या उमेदवारांची सरळ सेवा भरतीच्या अंतिम निवड यादीत समावेश झाला असेल तर अशा उमेदवारांना प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. या उमेदवारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यास त्यांना थेट नियुक्ती देण्याचे आदेश होते. या आदेशानुसार अंतिम निवडलेल्या १९३ उमेदवारांपैकी इतर विभागातील १५ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित उमेदवारांचे मात्र प्रशिक्षण रखडल्याने नियुक्त्याही रखडल्या आहेत.
बहुउद्देशीय प्रकारातील पदे
एस. टी. महामंडळाच्या परभणी विभागात २०३ पदे भरली जाणार आहेत. ती बहुउद्देशीय या प्रकारातील आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वाहक आणि चालक अशा पदांवर काम करावे लागणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण देताना उमेदवारांना वाहक आणि चालकांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर महामंडळाच्या वतीने गरजेनुसार या उमेदवारांकडून काम करून घेतले जाणार आहे.
एक वर्षांपासून रखडली प्रक्रिया
एस. टी. महामंडळाची ही प्रक्रिया मागच्या एक वर्षापासून रखडली आहे. अंतिम यादीत निवड झाल्यानंतरही नियुक्ती आदेश मिळाले नसल्याने उमेदवारांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. भरतीप्रक्रियेतील या उमेदवारांची निवड अंतिम आहे. आता नियुक्ती आदेश केव्हा दिले जातात, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.