कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी पालकमंत्री नवाब मलिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या अनुषंगाने जिल्हा कचेरीत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, खासदार बंडू जाधव, खासदार फौजिया खान, आमदार राहुल पाटील, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, जि. प. सीईओ शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे आदींची उपस्थिती होती.
यावेळी खासदार जाधव यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कारभारावर संताप व्यक्त केला. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये ३०० रुग्ण उपचार घेत असताना दोन-दोन दिवस एकही फिजिशियन राऊंडला जात नाही. ४ क्लाववन अधिकारी असताना तेही तिकडे फिरकत नाही. जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे व इतर डॉक्टर यांच्यात समन्वय नाही. नागरगोजे यांचा मनमानी कारभार सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीत जी कंत्राटी पद्धतीवर भरती केली गेली, त्यावेळी त्यांनी त्यांच्या अहमदपूर या गावाहून व्यक्ती आणून त्यांची भरती केली. रुग्णालयातील लॅब कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांपासून पगार दिला जात नाही. इतर कर्मचाऱ्यांना २२ तारखेपर्यंत पगार केला जात नाही, आदी मुद्दे उपस्थित करून खासदार जाधव यांनी नागरगोजे यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. परभणीतील खासगी ऑक्सिजन प्लांटला पूर्वी चाकण येथून लिक्वीड ऑक्सिजन मिळत होते. आता कर्नाटकातील बेल्लारी येथून दिले जात आहे. ही गैरसोयीची बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न सोडवावा, असा मुद्दा खासदार जाधव यांनी उपस्थित केला असता पालकमंत्री मलिक यांनी त्यांना बोलण्यापासून रोखले. त्यानंतरही खासदार जाधव बोलत असताना मलिक रोखत असल्याने जाधव संतापले. आमचे बोलणे ऐकूनच घ्यायचे नसेल तर मग आम्हांला कशाला बोलावले? असे सवाल करून असे चालणार नाही. आम्ही संकटातील जनतेबाबत बोलत असताना बोलू देत नसाल तर सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले.
खासदार फौजिया खान म्हणाल्या की, जिल्ह्यात अधिकाऱ्यांत समन्वय नाही. जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधींना सन्मान देत नाहीत. पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे काही वेळ दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची विनंती त्यांना केली होती. त्याबाबत त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. असे चालणार नाही. लोकांना आम्हांला उत्तर द्यावे लागते, असे त्या म्हणाल्या. बॅंकेकडून होणारी कर्ज वसुली काही कालावधीसाठी बंद करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर, सेलू येथे ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्याची मागणी केली. तसेच गावातील शाळेत संशयितांना क्वारंटाईन करण्याची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यास तातडीने मंजुरी देण्यात आली. वॉररूमधील कर्मचारी पुरेशी माहिती देत नाहीत, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली.
खासगी डॉक्टरांची सेवा बंधनकारक करा - पाटील
यावेळी बोलताना आमदार राहुल पाटील यांनी सरकारी रुग्णालयात फिजीशियनची कमतरता आहे. शहरात ४० ते ५० फिजीशियन आहेत. त्यापैकी प्रत्येकास सरकारी रुग्णालयात २ तास सेवा बंधनकारक करा, असे सांगितले. तसेच भविष्यात ऑक्सिजनची मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करावे, बांग्लादेशप्रमाणे रूग्णांना औषधी किटचे वाटप करा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.