परभणी : कोरोना संसर्गापासून सुटका होते न होते तोच जिल्ह्यात आता डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण वाढले आहेत. सर्दी, ताप आणि इतर त्रासाने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये सध्या हीच लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत.
दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटल्याने नागरिकांना हायसे वाटले होते. दोन वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरलेला होता. त्यामुळे दरवर्षी येणाऱ्या डेंग्यू, मलेरिया हे साथीचे आजार कमी प्रमाणात उद्भवले होते. मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापाची साथ पसरली आहे. सरकारी आकडेवारीनुसार डेंग्यू झालेल्या रुग्णांची संख्या नगण्य असली तरी डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या मात्र अधिक आहे. खासगी रुग्णालयांमध्ये तापाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. सरकारी रुग्णालयांमध्येदेखील ताप, डोकेदुखी, सर्दी अशी लक्षणे जाणवणारे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे डेंग्यूसदृश तापाच्या साथीने जिल्हावासीय सध्या त्रस्त आहेत.
डेंग्यूचा डास ओळखायचा कसा?
डेंग्यू ही साथ एडिस इजिप्ती या डासांपासून पसरते. हा डास आकाराने लहान असतो. त्याच्या पायावर चट्टे असतात. स्वच्छ पाण्यावरच तो राहतो. हा डास शक्यतो दिवसा चावतो. इतर डासांच्या तुलनेत कमी उंचीवर उडणारा हा डास आहे. फळे, भाजी किंवा झाडांवर एडिस डास आढळत नाही.
काय उपाय करावेत?
प्रत्येकाने घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, आठवड्यातून एक दिवस घरातील पाण्याचे सर्व भांडे रिकामे करून कोरडा दिवस पाळावा, नाल्या वाहत्या कराव्यात, मच्छरदाणीचा वापर करावा, नाल्यांच्या बाजूने ॲबेट टाकावे.
सीईओंनी आरोग्य यंत्रणेला दिला सतर्कतेचा इशारा
डेंग्यू, चिकुन गुन्याचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करा, अशा सूचना केल्या आहेत. डासांचे निर्मूलन हाच यावर प्रमुख उपाय असल्याने गप्पी मासे पैदास केंद्रांची संख्या वाढवावी. सद्य:स्थितीला जिल्ह्यात २९५ गप्पी मासे पैदास केंद्र आहेत. पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येक ग्रामपंचायतीत गप्पी मासे पैदास केंद्र उभारण्याच्या सूचना शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत.
बायोलॉजिकल नियंत्रणावर भर
डेंग्यूसदृश आणि इतर तापीच्या साथी नियंत्रणात आणण्यासाठी बायोलॉजिकल आणि केमिकल नियंत्रण या दोन पद्धतींचा वापर केला जातो. मात्र, सीईओंनी बायोलॉजिकल कंट्रोलवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात गप्पी मासे पैदास केंद्र वाढविले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विद्यासागर पाटील यांनी दिली.
डेंग्यू, चिकुन गुन्याचेही रुग्ण
सध्या डेंग्यूसदृश तसेच चिकुन गुन्या, घोड्या गोवर या तापीचे रुग्णही उपचारासाठी येत आहेत. जिल्हाभरातून येणाऱ्या या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. डेंग्यू तापीचे चार प्रकार आहेत. या चारही प्रकारचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
डॉ. रामेश्वर नाईक
जुलै महिन्यात झालेल्या तपासण्या
मलेरिया : २३,४९२
डेंग्यू : २७६