परभणी शहरासह जिल्ह्यात मागील वर्षभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतच होती. सध्या रुग्ण निघण्याचे प्रमाण कमी असले तरी जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ७९७ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काही जणांचे व्यवसाय ठप्प झाले. याचा परिणाम जीवनावर झाला आहे. यामुळे काहींना ताणतणावाने ग्रासले आहे. तसेच हाताला काम नसल्यामुळे दिवस-रात्र मोबाइलचे वेड अनेकांना जडले. यामध्ये युवकांसह लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मोबाइलच्या वेडाने अनेकांची झोप कमी झाली आहे. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
नेमकी झोप किती हवी ?
नवजात बाळ - १५ ते १६ तास
१ ते ५ वर्षे - १० तास
शाळेत जाणारी मुले - ८ तास
२१ ते ४० - ८ तास
४१ ते ६० - ८ तास
६१ पेक्षा जास्त - ८ तास
झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम
पचनावर होतो परिणाम
आम्ल पित्त होणे
मानसिक ताणतणाव येणे
वजन वाढणे किंवा घटणे
महिलांना थायराॅइडचा त्रास होेणे
मासिक पाळीत अनियमितता येणे
झोप का उडते
दररोजच्या जीवनातील छोट्या-मोठ्या गोष्टींचा ताणतणाव मनावर असल्यास त्याचा परिणाम झोपेवर होतो. जेवन उशिरा केल्याने झोप उडते. सतत मोबाइल, टीव्ही यांचा वापर केल्यास झोपल्यावर त्याच गोष्टींचा डोक्यात विचार येतो. बौद्धिक कामाचा ताणसुद्धा झोप कमी करू शकतो.
डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको
झोप येत नाही म्हणून झोपेची गोळी घेणे हा काही पर्याय नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. झोपेची गोळी डाॅक्टरांना विचारल्याशिवाय अजिबात घेऊ नये, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.
मोबाइलवर बोलणे हे व्यसन झाले आहे. सोशल मीडियावर दिवस-रात्र ॲक्टिव्ह राहणे, ही सवय कोरोनाकाळात अनेकांना जडली आहे. मोबाइलचा वापर कमी करावा. तसेच रात्री झोपेपूर्वी मोबाइल जवळ ठेऊन झोपू नये. - डाॅ. महेश सवंडकर.
चांगली झोप यावी म्हणून....
नियंत्रित आहार ठेवावा.
दररोज व्यायाम करावा.
रात्री ९ ते १० पूर्वी झोपावे.
गाणी ऐकावीत.
पुस्तकांचे वाचन करावे.
मांसाहार करू नये.
मद्यपान, धूम्रपान करू नये.
रात्री हलका आहार घ्यावा.
मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.