भूजल पातळी खालावल्याने टंचाई
परभणी : जिल्ह्यातील भूजल पातळीत मार्च महिन्यामध्ये मोठी घट झाली आहे. लघू प्रकल्पांमधील पाणी साठा संपला असून, त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांचा पाणी साठा आटल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
जिल्ह्यात पुलाची कामे संथगतीने
परभणी : जिल्ह्यात तीनही मार्गांवर रस्त्यांच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे. परभणी ते वसमत या मार्गावर असोला पाटी ते झिरोफाटा दरम्यान, रस्त्याचे काम केले जात आहे. गंगाखेड मार्गावरही हे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे तर जिंतूर मार्गावर देखील रस्त्याचे काम झाले आहे. परंतु, या तीनही मार्गावरील पुलांची कामे रखडली आहेत. वसमत रस्त्यावर राहटी बंधाऱ्यावर मोठा पूल आहे. हे काम गतीने करणे आवश्यक आहे. गंगाखेड आणि जिंतूर रस्त्यावरील पुलाची कामे संथगतीने होत आहेत.
जागेचा शोध घेण्याची प्रवाशांची मागणी
परभणी : येथील बसस्थानकात नवीन बसपोर्ट उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे स्थानकासाठी जागा अपुरी पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय हाेत आहे. सध्या १५ एप्रिलपर्यंत बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या काळात महामंडळ प्रशासनाने बसस्थानकासाठी पर्यायी जागेचा शोध घेऊन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
नवीन झाडे लावण्यास टाळाटाळ
परभणी : गंगाखेड रस्त्याच्या निर्मितीसाठी या मार्गावरील मोठी झाडे तोडण्यात आली. ही झाडे तोडण्यापूर्वी कंत्राटदाराने याच मार्गावर नवीन झाडे लावावीत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. या रस्त्याचे काम आता परभणी शहरापर्यंत आले आहे. परंतु, अद्यापपर्यंत या मार्गावर एकही झाड लावले नाही. त्यामुळे हा रस्ता उजाड दिसत आहे.