पती-पत्नीच्या नात्यात मनमोकळा संवाद असणे आवश्यक आहे. याशिवाय या नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा असेल तरच कुटुंबव्यवस्था मजबूत होते. अन्यथा विसंवादातून कौटुंबिक वाद वाढत जातात आणि शेवटचे टोकाचे पाऊल उचलत घटस्फोट घेण्यात येतो. कोरोनाच्या कालावधित कौटुंबिक वादातून घटस्फोट घेण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत परभणी शहरात विविध कारणांवरून २२ जणांनी घटस्फोट घेतला आहे. यातील दोन प्रकरणांत तर केवळ कोरोनामुळेच घटस्फोट झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा एकीकडे आरोग्यावर परिणाम होत असताना दुसरीकडे कौटुंबिक व्यवस्थेवरही परिणाम दिसून येत आहे.
पैशांची चणचण आणि कौटुंबिक वाद
घटस्फोटाच्या कारणांचा मागोवा घेतला असता पैशांची चणचण आणि कौटुंबिक वाद ही प्रमुख कारणे समोर आली आहेत. एकमेकांचे विचार, भावना समजून घ्यायच्या असतील तर नियमित संवाद असणे अत्यंत आवश्यक आहे. कधी-कधी संवाद नसल्याने नात्यात दुरावा निर्माण होतो. तेही घटस्फोटाचे कारण ठरते. शिवाय कुटुंबातील व्यक्तींच्या अधिक अपेक्षा असल्या आणि त्या अपेक्षांची पूर्तता न झाल्यासदेखील कौटुंबिक वाद निर्माण होतात. विशेषत: सासू-सून यांच्यातील वादाचे प्रसंग अधिक होतात. त्यातूनच घटस्फोटासारखे टोकाचे पाऊल संबंधितांकडून उचलण्यात येते.
कशामुळे झाले विभक्त
मुलगी सासरी गेली की तिच्या माहेरचे तिला प्रत्येक लहान-सहान गोष्टी विचारतात. त्यावर सासरच्या व्यक्तींसोबत कसं वागायचं याचीही माहिती मुलीला दिली जाते. अशा वारंवार होणाऱ्या हस्तेक्षपामुळेदेखील मुलींचा संसार धोक्यात येते. त्यामुळे कोर्टाची पायरी चढावी लागते.
परभणी येथील कौटुंबिक न्यायालयात घरगुती वादातून घटस्फोटाचे एक प्रकरण तब्बल १७ वर्षे चालले. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच संबंधित दाम्पत्याचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या या प्रकरणात चक्क हाणामारीपर्यंतच्या गोष्टी झाल्या. केवळ संवाद नसल्यानेच हे प्रकरण घडले.