परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला असून, शनिवारी १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ७८८ नवीन रुग्णांची दिवसभरात नोंद झाली.
मागील एक महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नव्या रुग्णांच्या नोंदीबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. शनिवारी शासकीय रुग्णालयातील १३ आणि खासगी रुग्णालयातील ३ अशा १६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ८ महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाला शनिवारी २ हजार २५० नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार ३५३ अहवालांमध्ये ४७३ आणि रॅपिड टेस्टच्या ८९७ अहवालांमध्ये ३१५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. एकूण ७८८ नवीन रुग्ण जिल्ह्यात नोंद झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण संख्या २५ हजार २५ झाली असून, त्यापैकी १८ हजार ४६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ६२३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, सध्या ५ हजार ९३७ रुग्ण उपचार घेत आहेत.
येथील जिल्हा रुग्णालयात १४८, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ११२, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २२७, अक्षदा मंगल कार्यालयात १५४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ४ हजार ७३७ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये आहेत.
४३६ जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यातील ४३६ रुग्णांनी शनिवारी कोरोनावर मात केली. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात २०५ खाटा रिक्त
दररोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयात खाटांची कमतरता पडत आहे. शनिवारी जिल्ह्यामध्ये २०५ खाटा रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्हा रुग्णालयात २, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ८८, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ७३ आणि अक्षदा मंगल कार्यालय ४ खाटा रिक्त होत्या. उर्वरित खाटा खासगी रुग्णालयांमध्ये रिक्त आहेत.