लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात खासगी पॅथॉलॉजींना शासकीय दर निश्चित करुन दिले असले, तरी त्याचे पालन होत नसून, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दराने तपासणी होत असल्याची बाब समोर आली आहे.
नागरिकांची आरटीपीसीआर आणि रॅपिड ॲन्टिजन चाचणी करण्यासाठी शासनाने दर निश्चित करुन दिले आहेत. मात्र, त्या दरापेक्षा अधिक दर घेऊन या तपासण्या होत आहेत. शिवाय कोविड रुग्णांवर उपचार सुरू असताना सीबीसी, डी-डायमर, सीआरपी, आदी तपासण्या केल्या जातात. मात्र, या स्वतंत्र तपासण्या करण्याऐवजी कोविड प्रोफाईलच्या नावाखाली एकत्रित बिल घेतले जात आहे. तालुक्याच्या ठिकाणी तर या तपासण्यात एचआयव्ही तपासणीचाही समावेश असल्याच्या तक्रारी आहेत.
तपासण्यांसाठी एजंटांची साखळी
कोरोनाबाधित रुग्ण एखाद्या खासगी दवाखान्यात उपचार घेत असेल तर त्याच्या तपासण्या करुन घेण्यासाठी एजंटांची साखळी असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
कोविड प्रोफाईलच्या नावाखाली अनेक चाचण्या एकत्रित करुन तपासण्या केल्या जातात. विशेष म्हणजे यात अनेकवेळा आवश्यकता नसलेल्या तपासण्याही करुन घेतल्या जात आहेत. त्यातून रुग्णांची लूट होत आहे.
मध्यंतरी शासकीय दवाखान्यातील रुग्णांच्याही तपासण्या खासगी प्रयोगशाळेतून केल्याचा प्रकार समोर आला होता. या सर्व प्रकारातून बाधित रुग्णांच्या तपासण्या करुन घेण्यासाठी त्या-त्या रुग्णालयात एजंट कार्यरत असल्याच्या तक्रारी आहेत.
जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
कोरोना काळात रुग्णांची लूट होऊ नये, यासाठी शासकीय दर निश्चित केले आहेत. त्या दरानुसारच रुग्णांकडून पैसे घेणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक प्रयोगशाळेने तपासण्यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अनेक प्रयोगशाळांनी हे दरपत्रकच लावलेले नाही. मात्र, प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही.
शासकीय केंद्रांवर होईनात तपासण्या
परभणी शहरात महापालिकेने कोरोना तपासणीची केंद्र कमी केली आहेत. जी केंद्र सुरू आहेत, तेथे अहवाल वेळेत मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव खासगी प्रयोगशाळांमध्ये जाऊन नागरिकांना तपासण्या कराव्या लागत आहेत.